थांब थांब! जागा हो रे,भूलोकीच्या पामरा
काय तू बडविशी असा स्वर्गलोकीच्या या द्वारा
पाप - पुण्याचा तुझ्या हिशोब दे आधी
कशी शिरेना रे, डोक्यात गोष्ट ही साधी!
च्यामायला! स्वर्गलोकीचे दार हे कोठूनि आले?
प्रातःविधी उरकण्यास लायनीतच ऊभा आहे,मला वाटले!
अरे!खरेच का तू चंद्रगुप्त स्वर्गलोकीचा?
....भूलोकावरील आमचा कार्यभाग ऊरकला म्हणायचा!
अहाहा! काय तर म्हणे कार्यभाग उरकला.....
पुण्यसंचय होईल पदरी असा काय दिवा लाविला?
कशास रे स्वर्गात पाठवू तुजला?
कार्यालयात पाट्या टाकण्यातच जीव तुझा गेला !
खबरदार! रे चंद्रगुप्ता, दे लगाम तुझ्या जीभेला....
भूलोकावरील कारकुनील व्यथा काय कळणार आहेत तुजला?
नको होऊस ऊन्मत्त, जरी तू तुझे काम करिसी चोख!
मोबदलाही तुला मिळत असेल, मदिरा,अप्सरा, सुवर्णमुद्रा रोख!
उठल्यापासून रांगेतच लागते उभे रहायला,
आधी दुधाला अन् मग चाळीतल्या एकमेव 'only for gents' ला!
नळाच्या रांगेवरची तर काय सांगू तुला बोंब!
ते department सौ चे आहे, म्हणून ती एक बाजू सोड...
८.१० ची लोकल पकडण्यातच रे धन्य जीव होतो
गर्दित त्या देह कोंबला तरच लेट मार्क चुकतो
दिवसभर हात दुखुन रे येती,खर्डेशाही करण्यात
तरीही घरी ना चाले दिरंगाई, मेथीची जुडी निवडण्यात!
तुच सांग रे चंद्रगुप्ता, नसेना का पुण्यसंचय जरी
परी नाही गाठीशीही आमच्या पापाचीही गठरी!
जर नसेल प्रवेश मला स्वर्गलोकात त्या शाही.....
तर ऐकून घेरे चंद्रगुप्ता,नरकात मी जाणार नाही,नाही, नाही.....
आरती...